म. टा. प्रतिनिधी, नागपूर

मित्राचा सकाळी सकाळी व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज दिसला, ‘तुझा फोटो पाठव’. विचारले, ‘अरे, पण कशाला?’ म्हणाला, ‘मी चॅलेंज स्वीकारलेय.’ केवळ त्याच्या आनंदासाठी म्हणून एक फोटो पाठवला. पुढच्या अर्ध्या तासात त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर मैत्रीचा मेळाच फुललेला दिसला. खूप सुखावणारे आहे हे.

करोनामुळे माणूस माणसापासून शारीरिकदृष्ट्या दूर झाला असला तरी या लॉकडाउनच्या काळात मित्र, नातेवाइकांना मनाने अधिक जवळ आणण्याचे काम व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकसारख्या सोशल माध्यमांनी केले आहे. सोशल माध्यमांमुळे नाती दुरावत असल्याची ओरड सारखी होत होती. मात्र, याच माध्यमांनी लॉकडाउनच्या काळात अनेकांना मानसिक आधार दिला. त्यांना त्यांच्या मित्रांशी, नातेवाइकांशी जोडून ठेवण्यात फार मोठी मदत केली.

लॉकडाउनमुळे घरीच बसण्याची वेळ आली. मात्र, हा रिकामा वेळ अनेकांनी कामी लावला. त्यांच्या प्रतिभांना नवीन धुमारे फुटत गेले. कोणी फेसबुकवर त्यांनी काढलेली चित्रे, फोटोग्राफ अपलोड केले, कोणी गाणी म्हटली, कोणी वाद्ये वाजवली तर कोणी नाटकही सादर केले. अशातच अनेकांनी आपल्या मित्रांना बेस्ट पिक चॅलेंज दिले. आपल्या मित्रांच्या फोटोंचा अल्बम तयार करण्याची ही कल्पना अनेकांची उचलून धरली. हे फोटो डीपी किंवा इतर कोणत्याही मार्गाने न मिळवता थेट मित्राला मेसेज किंवा फोन करून मिळवायचे, अशी त्याची अटच होती.

त्यामुळे मित्रांना मेसेज करून, फोन करून फोटो मागवले गेले आणि ते त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर अपलोड केले. प्रत्येक फोटोवर छान कमेंट्सदेखील लिहिल्या गेल्या. आपल्या मित्राला आपल्याबद्दल नेमके काय वाटते, हे जाणून घेण्याची संधी अर्थातच मित्रांनी सोडली नाही. कुणाच्या फोटोला किती लाइक्स मिळाले, याचीही चर्चा मग दोन-तीन दिवस चांगलीच रंगली.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here