म. टा. प्रतिनिधी, नागपूर

प्रादुर्भावाची वाढत असलेली नवी शृंखला गुरुवारी जोडली गेली. उपराजधानीत दोन नव्या रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचे गुरुवारी तपासलेल्या घशातील द्रवाच्या नमुन्यावरून सिद्ध झाले. नव्याने अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमुळे नागपुरातील करोना बाधितांची संख्या आता ५६ वरून दोनने वाढत ५८वर गेली आहे. या बाधितांमध्ये झोमॅटो डीलिव्हरी बॉयचा समावेश आहे. दिल्लीतही गुरुवारी झोमॅटो बॉय बाधित आढळला, हे विशेष.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू प्रयोगशाळेत तपासलेल्या नमुन्यांमध्ये या दोघांच्या घशातील द्रवात करोना विषाणूचा अंश आढळला. यात कन्हान येथील एका ६१वर्षीय ज्येष्ठाचा तर गिट्टीखदान येथील २५वर्षीय तरुण झोमॅटो डीलिव्हरी बॉयचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आढळलेले हे दोघेही वेगवेगळ्या परिसरातील आहेत. त्यामुळे त्यांच्या सहवासातून करोना प्रादुर्भावाची नवी साखळी जोडली जाते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

करोनाच्या चाचणीत गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी एकजण अजमेर येथून तर दुसरा नवीदिल्ली येथून प्रवास करून आला होता. या प्रवासाची पार्श्वभूमी असल्याने मधल्या काळात त्यांना करोनाची लागण होण्याची शक्यता पाहता या दोघांनाही रविभवनातील सक्तीच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी मेयोत पाठविले गेले होते. तेथे प्रतीक्षायादीत असलेल्या त्यांचे नमुने गुरुवारी तपासले गेले असता त्यात करोनाचा अंश आढळला.

गेल्या आठवड्यात सातत्याने करोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असलेल्या उपराजधानीत बुधवारी तब्बल सहा दिवसांच्या खंड पडल्याने नागपूरकरांना दिलासा मिळाला होता. मात्र, गुरुवारी यात आणखी दोघांची भर पडल्याने हा दिलासा फार काळ टिकू शकला नाही.

शुक्रवारचा आढावा…

दैनिक संशयित : ५०

एकूण संशयित : १,१८०

सध्या भरती संशयित : ६१

एकूण भरती संशयित : १,११०

एकूण भरती सकारात्मक रुग्ण : ४४

दैनिक तपासणी नमुने : १९

एकूण तपासणी नमुने : १४९६

आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने : ५८

घरी सोडलेले पॉझिटिव्ह रुग्ण : ११

घरी सोडलेले संशयित : १,०४८

विलगीकरण केलेले संशयित : ३१

विलगीकरण कक्षात भरती संशयित : ५६०

विलगीकरण कक्षातून घरी पाठविलेले संशयित : २४

पाठपुरावा सुरु असलेले एकूण संशयित : १,२६८

गिट्टीखदान व कन्हानमधील परिसर सील

करानाबाधित आढळल्यानंतर प्रशासनाने गिट्टीखदान व कन्हानमधील भागाला सील केले. कन्हान येथील ६१वर्षीय रुग्ण हा दिल्ली येथे गेला होता. त्यानंतर तो कन्हानमध्ये परतला. १ एप्रिलला त्याला नागपुरातील एकांतवास कक्षात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कन्हानमध्ये खळबळ उडाली. पोलिस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक संजय पुरंदरे यांनी कन्हान पोलिसांनी संपर्क साधून रुग्ण राहत असलेला परिसर सील करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर रुग्ण राहात असलेला परिसर सील करण्यात आला. या ठिकाणी उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक व १० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रुग्णाची पत्नी व मुलीलाही मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गिट्टीखदानमधील गौतमनगर परिसरातील रुग्णाचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने शहर पोलिस व महापालिका प्रशासनात खळबळ उडाली. गुरुवारी सायंकाळी वैद्यकीय पथकासह महापालिकेचे अधिकारी गिट्टीखदान पोलिस स्टेशनमध्ये धडकले. रुग्ण व त्याच्या नातेवाइकाबाबत पोलिसांना माहिती दिली. वृत्त लिहिपर्यंत गौतमनगर परिसराला सील करण्याचे काम सुरू होते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here