दावा

देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अधिकृत ट्विट सारखे दिसणारे एक ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये म्हटले की, अमित शहांना हाडाचा कॅन्सर झाला आहे. मुस्लिमाचा पवित्र महिना रमजान महिन्यात मुस्लिम बांधव सुद्धा माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करतील असे म्हटले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या ट्विटमध्ये म्हटले की, माझ्या सर्व देश बांधवांनो, माझ्या आयुष्यातील सर्व कामं मी केवळ देशाच्या हितासाठी केली आहेत. कुठल्याही जाती किंवा धर्माशी माझे काहीही वैर नाही. माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी गेल्या काही दिवसांपासून देशाची सेवा करु शकलो नाही. मला हे सांगताना खूप दुःख होत आहे की, मला हाडाचा कॅन्सर झाला आहे. या रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव देखील माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करतील, अशी मला आशा आहे. मी लवकरच देशाच्या सेवेसाठी पुन्हा हजर होईन. हे ट्विट अमित शहा यांच्या अधिकृत ट्विटर हँडलसारखे दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे.

‘टाइम्स ‘च्या एका वाचकाने आम्हाला या ट्विटचा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअॅप नंबर वर पाठवला व या ट्विटची सत्यता जाणून घेण्याची विनंती केली.

खरं काय आहे ?

ते ट्विट फेक आहे. अमित शहा यांनी अशा प्रकारचे कोणतेही ट्विट केलेले नाही.

कशी केली पडताळणी ?

अमित शहा यांच्या अधिकृत ट्विटरवर जाऊन आम्ही ट्विटची पडताळणी केली. अमित शहा यांनी काही दिवसांपासून अशा संदर्भातील कोणतेही ट्विट केलेले नाही. अमित शहा यांनी चुकीच्या बातम्या पसरवण्यात येत असल्याने आपल्या चाहत्यांसाठी आज एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही लोक माझ्या मृत्यूच्या बातम्या पसरवत आहेत. परंतु, माझ्या आरोग्याची काळजी करणाऱ्या सर्वांना माझा हा मेसेज पोहोचावा यासाठी हे ट्विट करण्यात येत आहे , असे म्हणत त्यांनी एक ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये ते म्हणतात, गेल्या काही दिवसांपासून काही जण माझ्या आरोग्याविषयी अफवा पसरवत आहेत. काही लोकांनी तर सोशल मीडियावर माझ्या आरोग्यासाठी प्रार्थनाही केली आहे. देशात सध्या करोनासारखे संकट आहे. मी माझे काम रात्र दिवस करीत आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि माझ्या चाहत्यांना माझी विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद. ज्या लोकांनी माझ्याविषयी अफवा पसरवली आहे. त्यांच्याप्रती माझ्या मनात कोणताही द्वेष नाही. त्यांनाही धन्यवाद, असे ट्विट अमित शहा यांनी केले होते.

निष्कर्ष

अमित शहा यांच्या ट्विटसारख्या दिसणाऱ्या ट्विटवरून केलेले ट्विट आणि अमित शहा यांना हाडाचा कॅन्सर झाला असल्याचा दावा करणारे ट्विट फेक आहे, असे ‘मटा फॅक्ट चेक’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here