फेसबुक आणि ट्विटरवर एक जखमी अवस्थेत पडलेल्या एका साधुचा फोटो शेअर केला जात आहे. उत्तर प्रदेशमधील वृदांवनमधील साधुला बांगलादेशींनी बेदम मारहाण केली, असा दावा या फोटोतून करण्यात येत आहे.
ट्विटर हँडल @RituRathaur वरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. यात म्हटले की, जखमी साधु भिंतीजवळ बसलेला आहे. भिंतीला रक्त लागलेले आहे. युजरने कॅप्शन लिहिले की, वृंदावनमध्ये बेकायदेशीरपणे राहत असलेले लोकांनी तमल कृष्ण दास नावाच्या पुजाऱ्यावर हल्ला केला. त्यांची हत्या केली. हे लोक पवित्र हिंदु नगरीत काय करीत आहेत. हे धक्कादायक आहे. हे गुन्हेगार प्रत्येक ठिकाणी पसरले आहेत. युजरने यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टॅग करीत लिहिलेय की, मथुरा पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे.
खरं काय आहे ?
सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट खोटी आहे. हे प्रकरण वेगळे आहे. इमलीतला गौडीय मठामध्ये पुस्तकांची खोली उघडण्यावरून स्थानिक लोकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. यातील मुख्य आरोपी सच्चिदानंद आहे. आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अद्याप कोणीही तक्रार केलेली नाही.
मथुरा पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या अफवेचे खंडन केले आहे. मथुरा पोलिसांच्या माहितीनुसार, ११ मे रोजी सायंकाळी साडे पाच वाजता इमलीतला गौडिय मठाच्या अध्यक्षाचे कार्यकर्ते गोविंद सच्चिदानंद जगन्नाथ व सुरक्षा रक्षक गोविंद सिंह, मठाचे माजी अध्यक्ष तमालदास यांच्यात हाणामारी झाली. यात हे दोघे जखमी झाले. उपचारासाठी त्यांना मथुरा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मुख्य आरोपी सच्चिदानंदला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
तसेच, याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याने आपली प्रतिक्रिया दिली.
निष्कर्ष
उत्तर प्रदेशातील वृदांवनमध्ये साधुची बांगलादेशींनी हत्या केली आहे, ही अफवा आहे. हे प्रकरण म्हणजे मठामधील अंतर्गत वाद आहे. साधुची हत्या झाली नाही. तसेच या प्रकरणाशी बांगलादेशींचा संबंध नाही, असे ‘मटा ‘च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times