तेजल निकाळजे, साठ्ये कॉलेज

ब्राइटनेस ठेवा कमी

ब्राइटनेस हा घटक तुमच्या मोबाइलच्या बॅटरीवर परिणाम करत असतो. बऱ्याच लोकांना ब्राइटनेस जास्त ठेवण्याची सवय असते. जास्त ब्राइटनेस असणाऱ्या मोबाइलची बॅटरी इतर मोबाइलच्या तुलनेत लवकर कमी होते. बॅटरी जास्त काळ टिकवण्यासाठी ब्राइटनेस शक्यतो कमी ठेवा. स्क्रीन सेटिंग किंवा टास्क बारवर जाऊन ब्राइटनेस ऑटोमॅटीक मोडवर सेट करा.

लॉकटाइमवर असू द्या लक्ष

मोबाइलची स्क्रीन लॉक होण्याची वेळसुद्धा कमी असायला हवी. मोबाइलचा वापर झाल्यानंतर कधीकधी तो लॉक करायला विसरून जातो. अशावेळी मोबाइलची स्क्रीन ऑन राहून बॅटरी कमी होते. यासाठी स्क्रीन सेटिंग समजून घेणं गरजेचं आहे. मुख्य सेटिंगमध्ये स्क्रीन सेटिंगवर क्लिक करून तो पाच किंवा दहा सेकंद करा. यामुळे डिस्प्ले विनाकारण चालू राहणार नाही. यासोबतच जलद गतीनं फोन चार्ज करणारे चार्जर (हाय व्होल्टेज चार्जर्स) वापरल्यानं देखील स्मार्टफोनची बॅटरी खराब होऊ शकते.

डार्कमोड आणि लोकेशन

डार्कमोड ऑन करण्याचे दोन फायदे असतात. पहिलं म्हणजे यामुळे बॅटरीची बचत होते. दुसरं आणि महत्वाचं म्हणजे डार्कमोडमुळे डोळ्यांना त्रास होत नाही. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबुक, युट्यूब, ट्विटर यांसारख्या अॅप्सना डार्कमोडची सेटिंग उपलब्ध आहे. या अॅप्सच्या मुख्य सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही डार्कमोड ऑन करू शकता.

वापरात नसलेले अॅप्स नकोच

मोबाइलची बॅटरी दीर्घ काळ टिकण्यासाठी अगदी छोट्या-छोट्या गोष्टी देखील कारणीभूत ठरू शकतात. वापरात नसणारे अॅप्स तुमच्या स्मार्टफोनचं स्टोरेजच नाहीतर बॅटरी देखील कमी करतात. बऱ्याचशा स्मार्टफोन युजर्सना याची कल्पना नसते. यासाठी तुम्हाला नको असणारे अप्स अनइन्स्टॉल करा किंवा मुख्य सेटिंगमध्ये जा तिथे तुम्हाला ‘अॅप्स’ पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून वापरात नसणाऱ्या अॅप्सना फोर्स स्टॉप करा. अशा पद्धतीनं विनाकारण खर्च होणाऱ्या बॅटरीची बचत करा.

दीर्घकाळ टिकण्यासाठी…

लॅपटॉप चार्ज करताना

अनेक मंडळी लॅपटॉप चार्जिंगला लावून काम करतात. हे अत्यंत चुकीचं आहे. लॅपटॉप १०० टक्के चार्ज न करता ८० ते ८५ टक्केच चार्ज करण्यावर भर द्यावा. काही लॅपटॉपमध्ये विशिष्ट सेटिंग असतात. त्याच्या मदतीनं बॅटरी १०० टक्के चार्ज होण्यापासून रोखू शकता. लॅपटॉपची बॅटरी शून्यावर न आणता ३० ते ४० टक्के शिल्लक असताना चार्जिंगला लावल्यास बॅटरीचं नुकसान होत नाही. शून्यापासून १०० टक्क्यांपर्यंत चार्ज केल्यानं बॅटरीवर ताण येऊन ती खराब होण्याची जास्त शक्यता असते.

योग्य जागी ठेवा

लॅपटॉपची बॅटरी उत्तम राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर सर्वात आधी या गॅजेटला शक्य तितक्या थंड वातावरणात ठेवायला हवं. लॅपटॉप जितका जास्त गरम तितक्या लवकर त्याची बॅटरी कमी होते, हे युजर्सनी लक्षात ठेवावं. लॅपटॉपला चार्ज करताना तो अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या जवळ ठेवू नये. स्वयंपाकघरात लॅपटॉप घेऊन जाणं टाळावं. जास्त तापमानामुळे तुमच्या बॅटरीवर परिणाम होऊ शकतो. लॅपटॉपच्या खाली उशी, चादर किंवा तत्सम गोष्टी ठेवू नका. यामुळे लॅपटॉप लवकर गरम होतो. परिणामी, त्याची बॅटरी लवकर उतरते.

अनावश्यक गोष्टी नकोच

बऱ्याचदा काम पूर्ण झाल्यावर देखील लॅपटॉपचं ब्लूटूथ आणि वायफाय ऑन असतं. यामुळे तुमच्या लॅपटॉपची बॅटरी लवकर उतरते. पेनड्राइव्ह, सीडी-डीव्हीडी, यूएसबी यांचा वापर चार्जिंग लवकर उतरण्यास कारणीभूत ठरू शकतो. तसंच लॅपटॉपचा वेगसुद्धा मंदावतो. वापर नसताना लॅपटॉप ऑन न ठेवता स्लीप मोडवर ठेवा. यामुळे देखील बॅटरीची बचत होते. एकावेळी दोनपेक्षा जास्त पोर्ट (यूएसबी फॅन, लाईट, माउस, चार्जर) कनेक्ट करू नये. यामुळे बॅटरीवर ताण येऊ शकतो.

वेळीच नवीन बॅटरी घ्या

लॅपटॉपचं आयुष्य पूर्णतः बॅटरीवर अवलंबून असतं. त्यामुळे लॅपटॉपची बॅटरी व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे. दिवसभरातील बरीच कामं तुम्ही लॅपटॉपवर करत असाल तर तुमच्याकडे एक अधिकची बॅटरी असायला हवी. याचा फायदा म्हणजे तुम्ही जर प्रवासात असाल तर अधिकच्या बॅटरीमुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. शिवाय, तुम्ही जर चार्जर घरी विसरला असाल तर एक्स्ट्रा बॅटरी तुमच्या मदतीला येईल. बॅटरी किंवा लॅपटॉप संबंधी अन्य वस्तू विकत घेताना कंपनीच्या अधिकृत सेंटरमधूनच विकत घेण्यास प्राधान्य द्या.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here