रामेश्वर जगदाळे

करोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये सोशल मीडियाचा वापर खूप वाढला आहे. ही वेळ साधत ऑनलाइन फिशिंग करणाऱ्या टोळ्या कार्यरत झाल्या असून, अनेकांचे हॅक केले जात आहेत. या माध्यमातून तुम्हीही अशा टोळ्यांची शिकार होण्याची भीती आहे. फोटोग्राफर पराग सावंत याला असाच एक अनुभव आला आणि इतरांना सावध करण्यासाठी त्यानं त्याचा अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडला आहे.

सोशल मीडिया अकाऊंट हॅक झालेल्या काहींना फिशिंगचे मेसेज, मेल येण्याच्या घटना घडताना दिसत आहेत. कुणाला, ‘तुमचं सोशल मीडिया अकाउंट काही कारणामुळे डिलीट होणार आहे. खाली दिलेल्या लिंकवर तुमची माहिती द्या, आम्ही तुम्हाला मदत करू’ अशा आशयाचे तर काहींना ‘तुम्ही अपलोड केलेल्या कंटेन्टमध्ये कॉपीराईट क्लेम आहे. तो घालवण्यासाठी तुमची माहिती आम्हाला द्या’ असे किंवा फोन येत आहेत. असाच एक मेसेज छायाचित्रकार पराग सावंतला आला होता. मात्र तो एक फिशिंग मेसेज आहे हे वेळीच ओळखून इतरांना अशा प्रकारच्या घटनांपासून सावध करण्यासाठी त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

लॉकडाऊनमध्ये खूप जण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झालेले दिसून येत आहेत. अनेकजण या माध्यमाचा वापर करून मनोरंजन, आपल्यातल्या कला, उपयुक्त माहिती अशा गोष्टी अपलोड करत आहेत. मात्र या काळात अनेक कलाकारांना आणि क्रिएटिव्ह आशय बनवणाऱ्यांना ‘तुमचं अकाऊंट काही कारणामुळे डिलीट होतं आहे, तुमच्या सोशल मीडिया अकाउंटचे आयडी पासवर्ड द्या’, ‘तुमचं अकाउंट काही वेळेत व्हेरिफाय होतं आहे तुमची माहिती आम्हाला पाठवा’ असे मेसेज येत आहेत. त्याचप्रमाणे अनेक जणांच्या कामाशी निगडित असणाऱ्या सॉफ्टवेअर कंपन्यांच्या नावानंसुद्धा वापरात असलेल्या सॉफ्टवेअरची माहिती जाणून घेण्यासाठी फोन आणि मेजेससुद्धा आलेले पाहायला मिळाले आहेत. सॉफ्टवेअर कंपनीच्या नावानं एक मेल येतो. खातरजमा करण्यासाठी पाहिलं तर त्या मेलमध्ये खऱ्या कंपनीचा पत्ता, फोन नंबर आणि बाकी गोष्टी दिलेल्या असतात. त्यामुळे तो मेल खरोखरच कंपनीकडून आला आहे आणि तेच माहिती विचारत आहेत, असं वाटतं. पण, प्रत्यक्षात असं नसतं. ‘माझ्या जवळच्या मित्रांजवळ विचारपूस आणि नीट तपासून पाहिल्यावर कळलं की असे कोणत्याही प्रकारचे मेल कंपनी पाठवत नाही आणि अशी कोणतीही माहिती मेसेज करून ते गोळा केली जात नाही’, असं परागनं सांगितलं.

माझ्या बाबतीत असा प्रकार यापूर्वीही झाला होता. आता लॉकडाउनमध्येसुद्धा पुन्हा एकदा हे झालं. माझे फोटोग्राफर आणि कलाकार मित्र यांना विचारलं तेव्हा, हे फिशिंग आहे असं समजलं. ज्या फोनवरून फोन येत होते त्या व्यक्तीला त्याची माहिती विचारली असता काही उत्तर आलं नाही आणि नंतर तो नंबर बंद झाला. हा प्रकार इतरांनाही कळावा आणि त्यांनी सावध व्हावं म्हणून मी माहिती चॅटसकट सोशल मीडियावर अपलोड केली.

– पराग सावंत (व्यावसायिक फोटोग्राफर)

आलेली लिंक युजरनेम व्हेरिफाय करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मेसेजमध्ये आलेली लिंक नवीन ब्राउजरमध्ये ओपन करून चेक करावी. तुमच्या कम्प्युटरमध्ये अँटीव्हायरस असेल तर अशा फेक लिंक तो ओपन करणार नाही. ९० टक्के खबरदारी आपणच घेणं अपेक्षित असतं. वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीपर माहिती प्रसारित केली जाते. कोणतीही सोशल मीडिया कंपनी अशा प्रकारचे मेसेज युजरला पाठवत नाही हे लक्षात ठेवा.

– उन्मेष जोशी, समन्वयक रिस्पॉन्सिबल नेटिझम

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here